KYC म्हणजे काय? KYC विषयी नेहमी विचारले जाणारे 7 प्रश्न
आधुनिक काळातील बँकिंग आणि गुंतवणुकीचे मार्ग काळाबरोबर लक्षणीय विकसित झाले आहेत आणि त्यानुसार त्याचे नियम,कायदे आणि आवश्यकता देखील विकसित झाल्या आहेत. त्यातीलच एक KYC!
आपला बऱ्याच वेळा KYC या शब्दाशी संबध आला असेल, नाही का? पण मग, KYC म्हणजे काय? बँका KYC का करतात? बँकांना KYC पूर्ण करण्यासाठी कोणती विविध कागदपत्रे लागतात आणि KYC च्या वेगवेगळ्या काय प्रक्रिया आहेत? या प्रश्नांची उत्तरे या ब्लॉगच्या माध्यमातून पाहूया.
1. KYC म्हणजे काय?
सोप्या शब्दात KYC म्हणजे आपल्या ग्राहकांना जाणून घेणे (क्नो युवर कस्टमर), ही एक प्रक्रिया आहे ज्यामध्ये बँका आणि इतर वित्तीय संस्था त्यांच्याशी आर्थिक व्यवहार करणाऱ्या ग्राहकांची ओळख आणि पत्ता पडताळून पाहतात. ही प्रक्रिया प्रत्येक वित्तीय संस्थेसाठी अनिवार्य आहे आणि रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने ती बंधनकारक केली आहे. खाते उघडणे, म्युच्युअल फंडामधील गुंतवणूक, कर्जासाठी अर्ज करणे, क्रेडीट कार्डसाठी अर्ज करणे, FDs, RDs मध्ये पैसे गुंतवणे इत्यादीसाठी KYC अत्यावश्यक आहे.
2. बँकेत खाते उघडताना KYC करण्यासाठी कोणती कागदपत्रे आवश्यक आहेत?
बँक खाते उघडताना आपण अलीकडील फोटोसह ID आणि पत्ता पुरावा आणि आधार क्रमांक/नोंदणी क्रमांक म्हणून PAN सादर करणे आवश्यक आहे.
3. पत्त्याच्या पुराव्यासाठी KYC कागदपत्रे कोणती?
- विजबिल (तीन महिन्यांपेक्षा जुने नको)
- टेलिफोन बिल (तीन महिन्यांपेक्षा जुने नको)
- पाण्याचे बिल (तीन महिन्यांपेक्षा जुने नको)
- पासपोर्ट
- वाहन परवाना
- मतदाराचे कार्ड
- वैध भाडे करार
- ICAI, ICWAI, ICSI, बार कौन्सिल इत्यादी महाविद्यालयांनी प्रिंट करून जारी केलेली पत्त्यासहित वैध ओळखपत्रे सुद्धा KYC पत्ता पुरावा म्हणून मानली जाऊ शकतात.
4. ओळख पुराव्यासाठी लागणारी कागदपत्रे कोणती?
- मतदार ID कार्ड
- पासपोर्ट
- आधार कार्डवरून मिळणारा UID
- फोटो असलेले PAN कार्ड
- राज्य किंवा केंद्र सरकार, नियामक संस्था इत्यादींनी जारी केलेली दस्तऐवज धारकाचा फोटो असलेली कागदपत्रे.
- ICAI, ICWAI, ICSI, बार कौन्सिल इत्यादी महाविद्यालयांनी जारी केलेली वैध ओळखपत्रे सुद्धा KYC पत्ता पुरावा म्हणून मानली जाऊ शकतात.
- एखादया व्यक्तीचे नाव आणि पत्ता असलेले वैध क्रेडीट किंवा डेबिट कार्ड
5. KYC पडताळणीचे विविध प्रकार कोणते?
KYC पडताळणीचे दोन प्रकार – आधार-आधारित KYC आणि वैयक्तिक KYC. KYC पडताळणीचे हे दोन्ही प्रकार पाहू.
आधार-आधारित KYC
आधार-आधारित KYC ऑनलाईन करता येते. जर आपल्याकडे इंटरनेट कनेक्शन असेल तर तुम्ही आधार-आधारित KYC करू शकता. तथापि, प्रक्रिया करण्यासाठी आपणास आपल्या मूळ आधार कार्डाची एक प्रत स्कॅन करून अपलोड करण्याची आवशक्यता आहे.
म्युच्युअल फंडाच्या गुंतवणुकीचे उदाहरण पाहूया. जर तुम्हाला एखादया विशिष्ट म्युच्युअल फंडामध्ये गुंतवणूक करायची असेल आणि आधार-आधारित KYC करायची असेल तर तुम्ही प्रतिवर्षी केवळ रुपये 50,000/- गुंतवू शकता. तथापि, आपण अधिक गुंतवणूक करणार असाल तर आपल्याला वैयक्तिक KYC पडताळणी करावी लागेल.
वैयक्तिक KYC पडताळणी
नावाप्रमाणेच, वैयक्तिक KYC पडताळणी ही ऑफलाईन म्हणजेच वैयक्तिकरित्या करतात. वैयक्तिकरित्या KYC पडताळणी पूर्ण करण्यासाठी तुम्हाला KYC कियोस्क किंवा बँकेला भेट देण्याची गरज आहे आणि आधार बायोमेट्रिक्सवरून आपली ओळख पटवणे आवश्यक आहे. तथापि, आपल्याला स्वतःहून बँकेत जाणे शक्य नसेल तर आपण आपल्या बँक प्रतिनिधीला किंवा तृतीय पक्षाच्या विक्रेत्याला कॉल करून KYC प्रतिनिधीला आपल्या निवास स्थानी किंवा ऑफिसमध्ये पाठविण्याची विनंती करून KYC प्रक्रिया पूर्ण करू शकता.
आजकाल आणि विशेषतः या कोव्हीड महामारीच्या काळामध्ये बँका किंवा वित्तीय संस्था व्हिडिओ कॉलवरून आपली KYC प्रक्रिया पूर्ण करतात, ज्यामध्ये विनंतीनुसार आपण आपले आधार कार्ड आणि इतर कागदपत्रे दाखविणे आवश्यक आहे.
6. आपण KYC पूर्ण केल्यानंतर देखील आपल्याला वेळोवेळी KYC करणे आवश्यक असते का?
होय. बँकांना त्यांची KYC रेकॉर्ड्स वेळोवेळी अद्यतनित करणे गरजेचे असते. त्याची दोन करणे आहेत. प्रथम ग्राहकांच्या खात्याविषयी फसवणूक रोखणे हा त्यांच्या उपायांचा एक भाग आहे आणि दुसरे,बँक खात्यांवरील चालू कामाचा हा एक भाग आहे. खात्याचा प्रकार आणि बँकेच्या जोखीम प्रक्रियेसारख्या घटकांनुसार आपले KYC रेकॉर्ड अद्यतनित करण्यासाठी बँकेचा आपल्याला कॉल करण्याचा किंवा संपर्क साधण्याचा कालावधी बदलतो. परंतु, त्यांची KYC रेकॉर्ड अद्यतनित करण्यासाठी बँक आपल्याशी नक्कीच संपर्क साधू शकते.
7. आपण बँकेत उघडलेल्या प्रत्येक खात्यासाठी KYC प्रक्रिया पूर्ण करणे आवश्यक आहे का?
नाही. जेव्हा आपण एखादया बँकेत KYC – अनुपालन खाते उघडता केवळ तेव्हाच सर्वप्रथम KYC करणे आवश्यक असते. त्याच बँकेत नवीन खाते उघडताना आपल्याला तीच कागदपत्रे परत सादर करण्याची आवशक्यता नसते.
KYC ही एक अत्यावश्यक प्रक्रिया आहे, ज्यामुळे बँक आणि वित्तीय संस्थांना त्यांच्या ग्राहकांच्या ओळखीची पडताळणी करण्यास मदत होते. ही प्रक्रिया बँकांच्या सुरक्षेच्या दृष्टीकोनातून महत्वाची आहे आणि अशाप्रकारे फसवणूक, बनावट ओळख अशासारख्या सुरक्षिततेच्या चिंता टाळल्या जातात. या ब्लॉगमध्ये आपणास KYC विषयी पुरेशी माहिती मिळाली असेल अशी आम्ही आशा करतो. अधिक अद्यतनांसाठी अर्थशिक्षण पोर्टलचे अनुसरण करत रहा.